अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

वैज्ञानिक दृष्टिकोन

वैज्ञानिक दृष्टिकोन
कॅप्शन जोडा
बहुधा सगळयाच सुजाण नागरिकांना, भारत या राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहीत असतात; पण फारसं
कुणालाच हे माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ
प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित
शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा
विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे. पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये विज्ञानाची प्रगती आणि सामाजिक सुधारणा,
बऱ्याच प्रमाणात जोडीनेच झाल्या. आपल्याकडे आधी विज्ञानाची फक्त सृष्टी आली; पण विज्ञानाची दृष्टी येण्यासाठी
आवश्यक संधी, आणि योग्य प्रकारचं शिक्षण, यापासून सर्वसामान्य माणूस वंचितच राहिला. आपण 'विज्ञानयुग' आहे
असं म्हणतो, कारण गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षात, विज्ञानाची प्रगती फार प्रचंड वेगानं झाली. त्यातही गेल्या काही
दशकात, इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि नंतर कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे तर, ही वाढ घातांकाच्या श्रेणीने होत आहे.
आज अवकाशात झेप घेऊन, सागरात सूर मारून माणूस शब्दश: त्रिलोकसंचारी झाला आहे. मूलभूत गरजांच्या
पूर्ततेपासून चैनीच्या वस्तूंच्या सहज उपलब्धतेपर्यंत, सगळयाच गोष्टी, विज्ञानामुळेच साध्य आणि शक्य झाल्या आहेत.
व्यक्तिगत परिचर्येपासून सामाजिक स्थैर्यापर्यंत, सर्वच क्षेत्रांत विज्ञानाची प्रगती, तिचं सहज विस्मरण होण्याइतकी झाली;
पण या सगळया प्रगतीबरोबर जी मानसिकता यायला हवी, ती येत नाही. विज्ञानाची प्रगती कुतूहल, चौकसपणा या
गुणांच्या आधारावर सृष्टीची कोडी उलगडण्याच्या प्रयत्नातून झाली; पण ही चिकित्सेची, सत्य शोधण्याची जाणीव काही
रुजलेली दिसत नाही. का, कसं हे कुतूहल नाही, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. मुख्य म्हणजे हा अभाव
सगळीकडेच जाणवतो. तरुणांपासून वृद्धांपर्यंत, घरापासून व्यवसायापर्यंत सगळीकडेच! निरक्षरता किंवा अपुरं शिक्षण, हे
त्याचं कारण नाही, कारण जिथे आपण शिक्षण घेतो, त्या शाळा, कॉलेजांमध्येही, ही चिकित्सेची जाणीव करूनच दिली
जात नाही. माहितीचा साठा आजच्या स्पर्धेच्या युगात हवा हे खरंच; पण कार्यकारणभाव शोधण्याची सवय होणं,
तितकंच गरजेचं आहे. विज्ञान म्हणजे, केवळ जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, एवढंच नाही, तर समाजशास्त्रंही
त्यातच येतात, कारण तिथेही कार्यकारणभाव आणि चिकित्सा लागतेच. म्हणूनच विज्ञान हे आपलं आहे, लोकांचं आहे,
लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं लौकिक आहे, इहलौकिक आहे

शरद वानखेडे 
अकोला महाराष्ट्र 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा