विजय चौकेकर यांनी तीनवेळा घरी जाऊन केली पोलखोल .
आचरा वार्ताहर
मालवण तालुक्यातील आचरे गावातील एका वाडी मध्ये येथे एक भोंदू बाबा देवदर्शनाला गेले असता वृद्ध गृहस्थाच्या रुपात वेताळ देव येऊन त्यांनी त्यांचेकडे पैसे मागितले . त्यांनी खिशात असलेली थोडीशीच रक्कम त्या वृद्ध व्यक्तीला दिली . त्यांनी ती सर्व रक्कम त्यांना परत केली व काही वस्तू दिल्या व ती व्यक्ती अदृश्य झाली . तेथील पुजाऱ्याला विचारले असता वेताळ देव असेच अनेकांना कोणाच्या ना कोणाच्या रुपाने येऊन मदत करतात.आज तुमच्यावर त्याने कृपा केली असे त्या पुजाऱ्याने त्यांना सांगितले .त्यांनी दिलेली वस्तू त्यांनी आपल्या अंगणात ठेऊन त्याचे पुजन केले . वेताळ देवाचे पाषाण आणि खांब उभा केला आणि तेथे कौल लावायला सुरुवात केली . त्या दिवसा पासून त्याला लोकांच्या समस्या, भविष्य काळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ ओळखण्याची सिद्धी प्राप्त झाली असा दावा करू लागला .
यासाठी त्याने सोशल मिडियावर कौल लाऊन सर्व कामे केली जातील .कौला साठी गुगलपे ने शंभर रुपये पाठवल्यास सहा तासात कौल लावून समस्या सांगितली जाईल . यासाठी स्वतःचा गुगल पे आणि हॉटॲप नंबर दिला . समस्येसाठी साडेतीनशे रुपया पासून बाराशे पन्नास रुपया पर्यंत तावीत देण्यास येईल .
प्रसादाने उत्तर म्हणजे जो ञास असेल किवा अडथळे असतील ते तुम्हाला सांगु. तुम्हाला होणार्या सर्व ञासांची कारणे.सोबत सर्व उपाय सांगीतले जातील. तुम्हाला योग्य असेल तो उपाय करा.त्यानंतर कोणताही ञास असला तरी तावित दिली जातात . त्याची वर्षाची मूदत असेल . जुना नविन कोणताच ञास होणार नाही.भरभराट होणे साठी किंवा कर्ज उतरण्यासाठी चालगती ( राखणेची विधीवत वस्तु ) दिली जाते.त्याची किंमत साडेतीन हजार ते १५हजार खर्च येईल .
सर्व आपल्या पत्यावर स्पिड पोस्टने पाठविले जाईल.जनावर चावु नये या साठी सुद्धा तावीत दिली जातात .भरभराट होणेसाठी,प्रगती होणेसाठी चालगती मिळेल,नवग्रह शांती केली जाईल.काळसर्प दोष महाकाल व चाळ्यांना नंदादिप ठेवला जातो.अचुक जन्मपञिका दोनशे रुपयात काढून मिळेल.नवग्रह शांती, महाकाल नवग्रहांची तावित पंधराशे रुपयाला मिळेल.
येथे सर्व कामे १००% केली जातात.
अशा प्रकारची पोस्ट टाकून आपल्या अलौकिक शक्तीने लोकांच्या समस्या निवारण्याचा दावा केला होता . सदरची पोस्ट वाचनात येताच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक यांनी त्यांच्या घरी तीन वेळा जाऊन कौटुंबिक समस्या सांगून त्या वरील उपाययोजना आणि खर्चही विचारून घेतला होता . स्वतःची ओळख शिक्षक असल्याचे खरे सांगून विश्वास संपादन केला. फोन द्वारे समस्या सांगून त्याचे कॉल रेकॉर्ड केले . तसेच घरी गेल्यावर त्याचे सर्व बोलणे व्हिडिओ रेकॉर्ड केले .त्यानंतर समस्येची निराकरण करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष ॲड .राजिव बिले , जिल्हा सचिव अजित कानशिडे, कार्यकर्ते मारुती सोनवडेकर आदि ना घेऊन त्यांच्या घरी पुन्हा काही समस्या विचारल्या . यावेळी स्वतःची ओळख इतरांची ओळख करून देताच आणि जादूटोणा विरोधी कायदा काय आहे आणि आपण कोणकोणत्या अनुसूचीचे उल्लघन केले त्यासाठी कोणती शिक्षा आणि दंड आहे याची माहिती दिली .
त्यावेळी त्याने मला काही अलौकिक शक्ती प्राप्त झालेली नाही. मी आता असे कोणाचेही काम करणार नाही . भाविकांना यायचे असेल तर ते पाषाणाच्या दर्शनाला येऊ शकतात . पण यापुढें मी अशी कोणतीही कामे करणार नाही . मला एक वेळ संधी द्यावी अशी लेखी विनंती केली .
तसे त्याने आपला छोटा व्हिडिओ बनवूनही कबूली जबाब दिला .
त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्या साठीच ते हे सर्व करीत असल्याचे लक्षात येताच त्याला सुधारण्याची संधी देण्याचा उददेशाने त्याची कोणतीही तक्रार पोलिस ठाणे येथे न करता त्याचा लेखी माफीनामा घेण्यात आला आणि जर पुन्हा भविष्यात अशा गोष्टी समोर आल्या तर मात्र रितसर गुन्हा दाखल करण्यात येईल असे त्याला व त्यांच्या पत्नीला सांगण्यात आले .
आज समाजात असे अनेक भोंदू बावा आपणास अलौकिक सिद्धी कुणाच्या तरी कृपेने प्राप्त झाली, मी कुणाचातरी अवतार आहे असा दावा करून जनतेच्या समस्यांचा गैर फायदा घेत आहेत .अशी कोणतीही अलौकिक आणि अदभूत शक्ती कुणाकडे असल्यास त्याने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ऐशी लाखाचे आवाहन स्विकारावे असे आवाहन अध्यक्ष श्री ॲड . राजिव बिले आणि संघटक विजय चौकेकर यांनी केले आहे . तसेच जर कुणाची फसवणूक अशा प्रकारे झाल्यास आपल्याशी संपर्क करावा असेही आवाहन केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा