अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

रविवार, ५ जुलै, २०२०


 *'गुरू ' हवाय की ' सुलभक '...?*

*" म्हाया कोणी गुरु नाही, अन् मले कोनी चेला नाही. " - गाडगेबाबा*
 
     वरील वाक्य डेबुजी आपल्या किर्तनातून लोकांना सांगत. ते असे का सांगायचे ?  कारण,  गुरू-शिष्य परंपरेतूनच शब्दप्रामाण्य जपणारा अचिकित्सक समाज निर्माण होत असतो. जो अंधश्रद्धेला नेहमी बळी पडतो. ही बाब ते जाणायचे. आज गाडगेबाबांचे विचार आदर्श म्हणनारे पण त्यांचे वरील वाक्य कदाचित ऐकले नसणारे बरेच लोक , "जीवनात मार्गदर्शनासाठी गुरू गरजेचे असतात." असे म्हणून, गुरूपौर्णिमा साजरी करतात, तिचे समर्थनही करतात, आणि गुरुही करतात. 
    *गाडगेबाबा अस का बोलायचे ?*  याविषयी थोडा आनखी विचार करू. आपण नेहमी पाहत असतो की, गुरू आपल्या विरूद्ध कधीच शिष्याला शंका घेऊ देत नाही. त्याच्या अस्तित्वाला आव्हान देणारे प्रश्न तो कधी विचारू देत नाही. त्याने सांगितलेल्या माहीती ( गुरूच्या मते ज्ञाना ) ची चिकित्सा करू देत नाही. म्हणजे " माझ्यावर श्रद्धा ठेवा. " हेच वाक्य प्रत्येक वेळी शिष्याच्या मेंदूवर अप्रत्यक्षपणे बिंबवल्या जात असत. यातून तयार होतात भक्त.  ( ही प्रक्रिया राजकारण आणि समाजकारणातही घडत असते. ) अश्या भक्तांचा  'गुरू ' खोट जरी बोलला,  गंभीर गुन्हा करून तुरूंगात जरी गेला तरीही ते भक्त मात्र, *" आमचा नेता, गुरू,  आमचे बापू निरपराध आहेत. त्यांना फसवल्या गेल आहे. "* असच ओरडून ओरडून सांगत असतात. आंधळ्या सारखे वागत असतात. *हे प्रत्येक क्षेत्रात, धर्मात थोड्याफार फरकाने पाहायला मिळत.*
( म्हणजे , *गुरू किंवा कुणीही ऐखात वाक्य , माहिती, घटना, चमत्कार सांगितला की त्याची चिकित्सा करायची नाही, तपासायचे नाही, पुरावा मागायचा नाही म्हणजे शब्दप्रामाण्य मानने होय.*)  
    ऐकीकडे गाडगेबाबांचे, संतांचे विचार सांगत प्रबोधन करायच, त्यांचे विचार आदर्श म्हणायचे तर, दुसरीकडे  मेंदूत अचिकित्सक विचार प्रक्रीया सुरू करून अचिकित्सक, अंधश्रद्धाळू समाज तयार करणा-या गुरूपोर्णिमा या दिवसाचे कौतुक करायचे ?  मला वाटत हा विरोधाभास ठरेल.  
  आज शाळेत शिक्षण देणारे गुरू (शिक्षक) आणि शिष्य (विद्यार्थी) यांच्यातील नाते  'ज्ञानरचनावाद ' या सिद्धांतावर आधारित नव्या अभ्यासक्रमाने अधिक स्पष्ट झाले आहे. आता, *गुरू (शिक्षक) हा ' सुलभक ' (अध्यापणाची प्रक्रीया सहज/सोपी करणारा) आहे. म्हणजे विद्यार्थी आपल्या ज्ञानाची रचना स्वःअनुभव घेत निर्माण करेल. शिक्षक फक्त ती प्रक्रीता सहज /सुलभ होईल याची काळजी घेईल, हे अपेक्षित आहे.  हा खरा गुरू. जो शिष्याला प्रश्न विचारू देण्यासाठी,  बुद्धीप्रामाण्यवादी, (प्रत्येक बाब चिकित्सकपणे तपासून सत्य स्वीकारणारा ) होण्याकरिता झटेल.*            

      काहींच मत असेल की, "जीवनात मार्गदर्शक हवा असतो, तोच आमचा गुरू. " 
  ठिक आहे , जर कुणी स्वतःची चिकित्सा करू देणारा, स्वतः विरूद्ध प्रश्न विचारू देणारा, शिष्याला बुद्धिप्रामाण्यवादी होण्यास मदत करणारा गुरू (मार्गदर्शक) कोणी असेल तर, तो 'सुलभक' ठरतो, त्याला विरोध नाहीच. परंतू  सहसा अस घडत नसत. *कारण की, सामाजिक जीवनातील धार्मिक 'मार्गदर्शक' (गुरू) म्हणून बापू,  बाबा, महाराज, स्वामी, अम्मा मार्गदर्शन करता करता 'मार्ग' सोडून फक्त 'दर्शन ' द्यायला लागतात.* हा प्रकार जागृत समाज घडवण्याच्या प्रक्रियेतील मोठा अडथळा आहे. बाकी आपण सुजाण आहात....  चला सुलभक शोधुया.... 
दि. 31/07/15
✏- *पंकज वंजारे*,  महाराष्ट्र राज्य संघटक अ.भा.अंनिस - युवा शाखा  9890578583

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा