साहित्य संमेलन भोगीदास आश्रमात? शुकदास महाराजाच्या हिवरा आश्रमात अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याचे कळते. विवेकानंदांसारख्या विवेकी योग्याचे नाव वापडणाऱ्या, पण प्रत्यक्षात 'रजनिशांच्या तंबूतील उंट'असणाऱ्या ढोंगी शुकदास महाराजांच्या आश्रमात साहित्य संमेलन घेऊन साहित्य महामंडळ साहित्य रसिक जनतेसमोर कोणता आदर्श ठेऊ इच्छिते.
दै. 'लोकमत'मध्ये 1984 मध्ये शुकदासाचे ढोंग उघडकीस आणणारे चार लेख मी लिहिले होते. त्यात ब्रह्मचारी असण्याचे सोंग घेणारा हा शुकदास सुंदर मुलींना एकट्यात 'गेल्या जन्मी मी भगवान कृष्ण ,तू राधा'असे सांगून कसे फशी पाडून त्यांचे शोषण करत असे हे विस्ताराने लिहिले आहे.'कृष्णाचे सोंग घेणारा राधेचा शुकदास' कसा श्रद्धेचा फायदा घेऊन फसवतो हे आजही माझ्या 1988 साली प्रसिद्ध झालेल्या'बुवाबाजी बळी स्त्रियांचा' या पुस्तकात वाचू शकता. असल्या ढोंगी बाबाला व त्याच्या शोषणाला साहित्य संमेलन प्रतिष्ठा देणार असेल तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व समविचारी पुरोगामी संघटनांच्या सह कडाडून विरोध करेल. संपूर्ण परिसरात' शुकदासांच्या रासलीला' जाहीर सभांद्वारे पुन्हा जनतेसमोर मांडू आणि रसिकांचे प्रबोधन करू.
श्याम मानव, संस्थापक व संघटक,अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती.