स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ओळख हिंदुत्वनिष्ठ म्हणून असली तरी त्यांना पटत नसलेल्या हिंदूंच्या अनेक रूढी परंपरेवर त्यांनी प्रखर टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समाजाला सामाजिक समरसतेचा विचार दिला आणि तो समाजात मांडला गेला पाहिजे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे देण्यात येणाऱ्या स्वा. सावरकर गौरव पुरस्कारासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निवड केली आहे. समितीच्यावतीने श्याम मानव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ सदस्य उमेश चौबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकरे, सचिव मुकुंद पाचखेडे उपस्थित होते. अकरा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदुत्वाचा विचार मांडताना सामाजिक विचारांचे भान ठेवत अंधश्रद्धेचा विचार मांडून तो कृतीत साकार केला आहे. हिंदूंच्या अनेक रूढी परंपरेवर त्यांनी टीका करून काही गोष्टी किती घातक आणि परंपरेला सोडून आहे हे त्यांनी दाखविले आहे. सावरकरांचे हिंदू प्रेम आणि मुस्लिमांविषयी त्यांना द्वेष होता असा अपप्रचार करण्यात आला होता. मात्र, त्यांनी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाला कधीच वेगळे बघितले नाही. ते जेवढी टीका हिंदूंवर करीत तेवढीच मुस्लिम अन्य धर्मांवर करीत असे आणि जे चांगले आहे त्याचा स्वीकार करीत होते. सावरकरांनी मनुस्मृतीची इतकी चिरफाड केली की तेवढी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली नाही. हिंदूंचा नादानपणा त्यांनी दाखवित असताना मुस्लिम समाजाचा वेगळेपणा दाखविला. गाय या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी टीका केली होती. गाय हा उपयुक्त पशु आहे असे त्यांनी लिहिले. सावरकरांनी वैज्ञानिकदृष्टय़ा विचार मांडून प्रत्येक गोष्ट त्यांनी पटवून दिली आहे. सावरकरांची देव देवतावर श्रद्धा असली तरी त्यांना जे पटत नव्हते त्यावर परखडपणे विचार मांडत होते. सावरकरांनी सामाजिक विचार मांडला आणि त्या विचारातून संस्थेने पुरस्कार दिला. सावरकरांचे सामाजिक विचार मांडण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असून त्यांनी प्रयत्न करावे, असेही मानव म्हणाले. यावेळी अशोक ठाकरे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय कुळकर्णी तर संचालन डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रा. दिनेश खुरगे यांनी केले. रंजना उपगडे यांनी गायलेल्या वंदेमातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली
|